निसर्गसंपत्तीची नोंदणीची सुरुवात आपण स्वतः वैयक्तिकरित्या करू शकतो, आपल्यापैकी बरेच जण वेगवेगळ्या प्रकाराने असे करतही असतात. उदाहरणार्थ गावात फेरफटका मारणाऱ्या ज्येष्ठ व्यक्तींना गावातील जैवविविधतेची माहिती असते, आयुर्वेदाशी संबंधित काम करणाऱ्यांकडे वनस्पतींची एक यादी असते, किंवा पक्ष्याचे फोटो काढणाऱ्या हौशी फोटोग्राफरला कोणते पक्षी कोणत्या ऋतूमध्ये घरटी करतात ह्यांसंबंधी ज्ञान असते. आता आपल्याला इतकंच करायचंय की ह्याच गोष्टींची नियमित लिखित स्वरूपात किंवा संगणकाच्या आधाराने यादी करायचीय. कागदोपत्री नोंदी करणं सोपं आणि कमी खर्चाचं असतं. स्थानिक निसर्गसंस्था ठरविक काळाने ही माहिती पुस्तिकेच्या माध्यमातून किंवा वर्तमानपत्रातून ही यादी छापील स्वरूपात प्रसारित करतात. उदा. कोकणातील वेळास कासव महोत्सवात यंदा कासवांची किती घरटी आढळली, त्यापैकी किती अंड्यातून कासवं सुखरूप बाहेर पडली, त्यात नर-मादी कासवांची वर्गवारी कशी होती. अशा प्रकारच्या माहितीचा पाच-सहा वर्ष संचय करून वैज्ञानिक त्यातून अनेक प्रकारच्या पर्यावरणातील प्रश्नांची उत्तरं देऊ शकतात. हा अभ्यास कालांतराने संशोधनाच्या माध्यमातून संशोधन नियतकालिकांमध्ये (Scientific research article) अर्थात शोधनिबंध म्हणून प्रस्थापित होतो. बरीच वर्ष ही प्रक्रिया शास्त्रज्ञ आणि पर्यावरणाचे विद्यार्थी/कर्मचारी यांच्यापुरतीच मर्यादित होती. मात्र इंटरनेट आणि मोबाईल डेटाच्या सुलभतेमुळे आता जनसामन्यांनाही ह्यात सहभागी होणे शक्य झाले आहे. सर्वसामान्यांसाठी विज्ञान म्हणजेच सिटीझन सायन्स ही संकल्पना जगभरातच जोर धरत आहे. ह्यासाठी आपल्याला आपली नोंदणीची प्रक्रिया थोडीशी अध्ययावत करायची आहे.
|
भारतात तसेच जगभरात इंटरनेटवर माहिती साठवली जाते हे आपल्याला माहिती असेलच आता ह्याच माहितीच्या आधारे वाचनालयातील ग्रंथ किंवा दस्तावेज यांची जागा आता ऑनलाईन माहितीसंचानी घेतली आहे. दुर्मिळ वनस्पती किंवा प्राणी ह्यांचा प्रत्यक्ष नमुना नसल्यास त्यांचा जनुकीय माहितीचा (DNA किंवा RNA रेणू) उपयोग करून त्यांच्या प्रजातीची निश्चिती करता येणे शक्य झाले आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे भारतातल्या एखाद्या शेतात आढळलेल्या फुलांच्याच जातीची फुले युरोपातील गवताळ कुरणात आढळतात का ह्या प्रकारच्या प्रश्नांची उत्तरेही आपण संगणकावर काही क्लिक्स च्या साहाय्याने मिळवू शकतो. भारतातील स्थानिक प्रजातींचा अभ्यास करून संकलन करण्यासाठी आपल्याकडे काही वर्षांपूर्वी "बायोडायव्हर्सिटी इंडिया ऍटलास" ह्या महत्वाकांक्षी प्रकल्पाची सुरुवात झाली त्यातूनच पुढे फुलपाखरांसाठी "बटरफ्लाईज ऑफ इंडिया" किंवा फुलझाडांसाठी "फ्लॉवर्स ऑफ इंडिया" ही संकेतस्थळे (Websites) सुरु झाल्या. आपल्यापैकी कोणीही ह्या वेबसाईट्सवर आपली नावनोंदणी करून माहिती व फोटो पाठवू शकता. ह्यासाठी फक्त आपल्याला ईमेल आयडी द्वारे आपली विश्वासार्हता सिद्ध करायची आहे आणि त्यानंतर आपल्या नोंदी त्या त्या ठिकाणी प्रसिद्ध होतील. ही सर्व प्रक्रिया पूर्णतः विनामूल्य आहे तसेच आपण काढलेल्या फोटो आणि माहितीचे संपूर्ण श्रेय (कॉपीराईट्स) आपल्याला मिळतात त्यामुळे आपली माहिती कोणी चोरून त्याचा अनधिकृत वापर करण्याची शक्यताही नगण्य असते. महत्वाचे म्हणजे संरक्षित प्रजाती किंवा ज्यांच्या शिकारीचा/तस्करीचा धोका आहे अशा प्रजातींचे भौगोलिक स्थान अंशतः गुपित ठेवण्याचीही येथे सोय आहे.
सर्वसामान्यांना वापरता येतील अशा काही सोप्या वेबसाईट्सची नावे, पत्ते आणि संक्षिप्त माहिती खालील तक्त्यात दिली आहे.
नोंदणीची ही प्रक्रिया पूणर्पणे मुक्त (अंशतः व्यवस्थापित), मोफत आणि जगभरातील सर्वांसाठी खुली आहे, फक्त श्रेयनामासाठी आपली ओळख वैधता प्रस्थापित करणे आवश्यक आहे. ह्यातील सहभाग पूर्णपणे स्वयंसेवी तत्वावर असतो. ह्याबद्दल कोणतेही शुल्क आकारले जात नाही अथवा मोबदलाही दिला जात नाही. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांपासून ते निवृत्त ज्येष्ठ नागरिक अथवा गृहिणींपर्यत कोणीही ज्याला स्वखुशीने कार्य करण्याची इच्छा आहे असे कोणीही यांत सहभागी होऊ शकतात. तेव्हा सर्वांनी उत्साहाने यांत सहभागी होऊया आणि निसर्गाच्या संवर्धनाला हातभार लावूया.
निसर्गसंपत्तीचे दस्तऐवजीकरण (बायोडायव्हर्सिटी डॉक्युमेंटेशन): का आणि कशासाठी? - भाग २
गौरव स. सोमण.
मुंबई उपनगर-जिल्हा समन्वयक
बिग बटरफ्लाय मंथ, सप्टेंबर २०२३
